राज्य शासनाने प्रशासाच्या दुर्लक्षाची दखल घ्यावी
शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची सुचना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
इशारा मिळून देखील जिल्हा प्रशासन बेसावध राहिल्यानेच महाड आणि पोलादपूर तालुक्यामध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणावर ग्रामस्थांचे बळी गेले. प्रशासनाच्या या दुर्लक्षाची दखल राज्य शासनाने घ्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
आ. जयंत पाटील यांनी व्हिडीओद्वारे जनतेसोबत संपर्क साधला. त्यावेळी ही मागणी केली. ते म्हणाले की, कोकणामध्ये महापूर आला, अतिवृष्टी होणार हे हवामान खात्याने सांगितले होतेच. पण हवामान खात्याने एक इशारा देखील दिला होता की, डोंगरभागात असलेल्या वस्तींचे स्थलांतर करण्याच्या सुचना देखील हवामान खात्यातर्फे सातत्याने केल्या जात होत्या. डोंगरभागामध्ये मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होणार आहे. दरगडग्रस्त जाहीर झालेल्या किंवा डोंगरामध्ये वास्तव्य आहे. त्याच्यामध्ये मोठया प्रमाणावर दरड कोसळण्याचे भाकीत वर्तवले होते. विशेषतः सह्याद्रीच्या सगळया डोंगरकपारीत, रायगड रत्नागिरीमध्ये मोठया प्रमाणावर दगड पडतील असेही सांगितले होते. गेल्या वर्षी आलेले वादळ त्या वादळात प्रशासनाने केलेली तयारी अलिबाग तालुक्यात 10 हजार मच्छिमार बांधव, अन्य वस्ती यांना सुरक्षित स्थळी हलविण्याची चांगली कामगिरी प्रशासनाने तीन दिवस तयारी केली. मुरुड अलिबाग, रोहा आणि श्रीवर्धन या परिसरामध्ये मोठया प्रमाणावर स्थलांतर केले. त्यामुळे जिवीतहानी झाली नाही. मला वाटते शंभर वर्षांनंतर एवढे मोठे चक्रीवादळ येऊन देखील कुठलीही जिवीत हानी झाली नाही.
यावेळी मात्र प्रशासन थोडे बेसावध राहिले. ज्या पद्धतीने प्रशासनाने काम करायला पाहिजे होते, त्या पद्धतीने त्याकडे बघीतले गेले नाही. आणि म्हणूनच महाड, पोलादपूरमध्ये अपघात होऊन एवढे मोठे बळी गेले आहेत. पोलादपूरमध्ये तर संपर्क होऊ शकत नाही एवढी मोठी दैना उडाली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानेच एवढे बळी गेले याची दखल राज्य शासनाने घेतली पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मोठया प्रमाणात रस्ते वाहून गेलेले आहेत. अलिबाग, मुरुड, महाड-पोलादपूर, पोलादपूर तालुक्यातील कापडे परिसरामध्ये तर रस्ताच शिल्लक राहिला नसल्याने लोकांना यायला जायला देखील रस्ते राहिलेले नाहीत. लोकांची अडचण निर्माण झाली आहे. संपूर्ण वाहतूकच बंद आहे. याठिकाणचे रस्त्याने जे मंत्री येतात जातात, शासन, प्रशासन येते जाते पण याठिकाणी झालेले नुकसान हे दोन्ही बाजूने व्यक्तीगत झाले आहे. आणि सार्वजनिक रस्ते आणि शाळा यांचे नुकसान झाल्याचे प्रामुख्याने दिसून येते. याचे पंचनामे योग्य रितीने झाले पाहिजेत. आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्त्यांच्या बाबतीत मोठया प्रमाणावर लक्ष दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागात गेलेल्या रस्त्यांकडे तातडीने निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे. अंतर्गत रस्त्यांकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. मोठया प्रमाणावर नुकसान झाले असल्याने नियमीत नव्याने निधी मिळणार नसला तरी आपतकालीन परिस्थितीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे येणार्या मदतीसाठी व्यवस्थीत पंचनामे करुन ते केंद्राकडे पाठविले पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी तरी प्रशासनाने चांगल्या प्रकारे प्रभावीपणे काम करुन गावोगावी जाऊन करावे. आणि पंचनाम्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी शाळा, रस्ते, सार्वजनिक मालमत्तेचे आणि वैयक्तिक नुकसानीची दखल घेण्याची गरज आहे.
महाड शहराचे पुनर्वसन तरी करा
मी अनेकवेळा विधी मंडळामध्ये देखील वारंवार बोललो की सावित्री नदीचे जे पात्र आहे, ते खोल करण्याची गरज आहे. तेथली रेती काढण्याची परवानगी देऊन ते खोल करुन त्याला संरक्षक भिंत बांधली पहिजे. किंवा मग महाड शहराचे पुनर्वसन तरी केले पाहिजे अशी मागणी देखील आ. जयंत पाटील यांनी केली आहे.
हे दरवर्षी पूरबळी, पाणी घुसून नुकसान होणार हे थांबविले पाहिजे. महाडमध्ये खास बाब म्हणून केंद्र सरकारसोबत महाड उठवून नवीन ठिकाणी वसविले पाहिजे. यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. दरवर्षी तेच तेच चर्चा होते. महाड मध्ये पुर येत नाही असा कुठलाच पावसाळा गेला नाही. यावेळी मोठया भयंकर प्रमाणावर नुकसान झालेले आहे. महाबळेश्वरच्या सह्याद्रीच्या डोंगरातील पोलादपूर जवळ जवळ उध्वस्त झाले असल्याचे लोक सांगतात. प्रत्यक्ष तिथे जाता येत नाही. या सगळयाची चर्चा केली. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शेकाप कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत करावी
मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, महाड पोलादपूरच्या सर्व ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करा. गावोगावी मदत गोळा करा. त्यांना कशी मदत पोचेल यासाठी प्रयत्न करा. दक्षिण रायगडमध्ये महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अस्लम राऊत, रमेश मोरे, चांदे, एकनाथ गायकवाड यांनी दौरा केला. काही ठिकाणी त्यांना पोहचता आले नाही. 25 हजार किलो धान्य त्या ठिकाणी पोहचवले. इतरत्र भागातील कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून धान्य कपडे गोळा करुन उपलब्ध करुन द्या असे आवाहन देखील शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी शेवटी केले.
मेणबत्ती देखील मिळत नाही. अजून काही दिवसतरी विज पुरवठा सुरळीत होईल असे काही वाटत नाही. ट्रान्सफार्मर बंद झालेले असल्याने ते सुरु केले तर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कंदिल, मेणबत्ती, बॅटरी याचीही मदत त्याठिकाणी करावी आपापल्या परिने शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांनी मदत देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.