..तर ठेकेदार, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठराव

| रायगड | खास प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत. या मार्गावर पुन्हा खड्डे पडून एखादा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्यावरही एकमत झाले. लोकप्रतिनिधींनी चांगला निर्णय घेतला असला तरी, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन येथे पार पडली. त्यावेळी असा ठराव घेण्यात आल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या 12 वर्षाहून अधिक कालावधीपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. खड्डे भरुन सध्या या मार्गाची मलमपट्टी करण्यात येत आहे. कालांतराने पुन्हा खड्डे पडून त्यामध्ये अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्सवाचा सण आता जवळ आला आहे. त्यामुळे हा मार्ग सुस्थितित करावा याबाबत नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यावर सर्व सदस्यांनी आवाज उठवला.

तळीयेचे पुनर्वसन करण्यात मविआ अपयशी
महाड तालुक्यातील तळीये येथील पुनर्वसन करण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहेत. त्यांनी पुनर्वसनाबाबत घेतलेले निर्णय कसे चुकीचे आणि वेळ काढू पणाचे होते, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले. म्हाडा मार्फत पुनर्वसन करताना बंधणे येतात याची मला जाणीव आहे. म्हाडाचा आवाका केवढा आहे याची मला माहिती आहे. मात्र आता मागील चुका दुरुस्त करण्यात येत आहेत. तळीयेच्या 66 घरांमध्ये काही त्रुटी शिल्लक आहेत. त्या दुर करण्यात येतील. यासाठी दोन कोटी रुपये लागणार आहेत. तसा प्रस्ताव मदत पुनर्वसन विभागाकडे पाठवला आहे. पुढील दोन महिन्यात तळीयेवासीय त्यांच्या हक्काच्या घरात राहण्यासाठी जातील, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. खालापूर तालुक्यातील इरर्शावाडीतील नागरिकांचे पुनर्वसन सिडको मार्फत आगामी सहा महिन्यात करण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील 20 गावे अतिधोकादायक क्षेत्रात येतात. तेथील दोन हजार कुटूंबातील आठ हजार नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version