मनसे नवी मुंबई शहराध्यक्षांचा इशारा
| खोपोली | प्रतिनिधी |
महानगरपालिका आणि खासगी शाळांची शैक्षणिक सहल वॉटर पार्क, अॅडव्हेंचर पार्कमध्ये आयोजित करू नका, असा शासनाचा निर्णय असतानाही नवी मुंबई महानगरपालिका आणि अॅडलॅब थिमपार्कने कंत्राट करून शैक्षणिक सहलीचे आयोजन केले. या सहलीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता आठवीत आयुष धर्मेंद्र सिंग या 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूला नवी मुंबई महानगरपालिका आणि अॅडलॅब थिमपार्क जबाबदार असल्याने कारवाई करण्याची मागणी मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केली असून, अॅडलॅब थीमपार्क पुन्हा शैक्षणिक सहल आयोजित केल्यात मनसे ‘खळ खट्ट्याक’ करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील इयत्ता आठवीत आयुष धर्मेंद्र सिंग हा विद्यार्थी इमॅजिका थिमपार्कमध्ये सहलीसाठी आला होता. बेंचवर बसला असतानाच अस्वस्थ वाटू लागल्याने तो तेथेच जमिनीवर कोसळला मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवार, दि.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. विद्यार्थ्याचा इमॅजिका थिमपार्कने नैसर्गिक मृत्यू असल्याचा भासविल्याने मनसे प्रचंड आक्रमक झाली असून, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली अॅडलॅब थिमपार्कच्या व्यवस्थापकांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अॅडलॅब थिमपार्कचे साबू नायर यांच्याबरोबर चर्चा झाली. याप्रसंगी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अदिती सोनार, रायगड जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना प्रसन्न बनसोडे, नवी मुंबई विध्यार्थी सेना अध्यक्ष संदेश डोंगरे, अभिषेक दर्गे, महेश सोगे, चेतन चोगले, विनोद कदम, मिलिंद चाळके, नवी मुंबई आरती धुमाळ, शहर अध्यक्ष यशोदा उलवा, वैशाली बोराडे, पनवेल शहर सचिव रूचिता सोनार, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रायगड भारती कांबळे उपस्थित होते. अॅडलॅब थीमपार्कमध्ये शैक्षणिक सहलीला पालकांनी मुलांना पाठवू नये, तसेच यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देणार असल्याचे गजानन काळे यांनी सांगितले आहे.