रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील वळके येथे गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक बहिष्कार केल्याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार मधुकर भगत (66) यांनी गुरूवारी (दि.11) रोजी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली आहे.
मधुकर भगत यांनी रेवदंडा पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सन 2016 पासून ते 8 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांच्या कुटुंबाला बेकायदेशीरपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरू होते. त्यातील शंकर सावंत, गोपीनाथ म्हात्रे, सुधाकर भगत, राजेंद्र भगत, कमळाकर पाटील, किसन म्हात्रे, शरद म्हात्रे, अनंता धोत्रे, कमलाकर म्हात्रे, भारत सावंत, राजीबाई भगत, निर्मल भगत, कुसुम म्हात्रे, सुधीर सावंत, नारायण वाजंत्री, जनार्दन भगत, लीलाधर काटकर, अनिल धनावडे, नथुराम धनावडे, आत्माराम म्हात्रे, सुभाष सावंत, अमोल भगत, शंकर भगत, जनार्दन म्हात्रे, राजेंद्र पाटील, हरिश्चंद्र म्हात्रे, किसन म्हात्रे, महादेव भगत, हरिचंद्र म्हात्रे, अरुण धनावडे यांनी गावातील महिलां संबंधित अन्यायकारक निर्णय, गाव पंचांचे दंड, वर्गणी, फंड आणि बेकायदेशीर वसुली यास विरोध केल्याने त्यांना वाळीत टाकण्यासह सामाजिक बहिष्कार आणि दहा वर्षांची दंडाची मागणी केली, असा आरोप मधुकर भगत यांनी केला आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबाचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने, प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आणि 1 हजार रुपये व्याज अशी रक्कम वसूल करण्याचा दबाव आणला असल्याचे देखील भगत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
