फिरत्या दवाखान्याचा रुग्णांना आधार; साडेसात हजार रुग्णांवर उपचार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी उसर येथील गेल इंडिया कंपनीमार्फत फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या फिरत्या दवाखान्याला गावे, वाड्यांमधील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दैनंदिन आजारासह मधुमेह, रक्तदाबसारख्या आजाराचीही तपासणी करून 7 हजार पाचशे 65 नागरिकांवर उपचार करण्यात आले आहे. या फिरत्या दवाखान्याचा गावांतील रुग्णांना आधार मिळाला आहे.
अलिबाग तालुक्यातील खानाव ते बेलोशी हा ग्रामीण भाग आहे. या परिसरात डोंगर माथ्यावर राहणारा आदिवासी, ठाकूर समाजही मोठ्या संख्येने आहे. या भागातील नागरिकांना उपचारासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. गेल इंडिया लिमिटेड कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत सीईआर, सीएसआर कार्यक्रमांतर्गत मोफत मूलभूत आरोग्य सेवांसह वोक्हार्ट फाऊंडेशनची मोबाईल क्लिनिक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. एमबीबीएस दर्जाचे डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, औषधे या सुविधा रुग्णवाहिकेमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नोव्हेंबरपासून कंपनीने फिरता दवाखाना गावागावात सुरु केला आहे. दर दिवशी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन गावांतील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. खानावसह वेलवली खानाव, उसर, घोटवडे, मल्याण, महाजने बेलोशी आदी परिसरातील असंख्य गावे, वाड्यांमधील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून 7 हजार 565 नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
गेल कंपनीच्या माध्यमातून रुग्णवाहिकेद्वारे सुरु करण्यात आलेला फिरता दवाखाना खानाव, धसाडे कुणे, वेलवली खानाव, कंटक कुणे, उसर, नाईक कुणे, मल्याण, बेलोशी, वावे, घोटवडे, मल्याण या गावांमध्ये सेवा देत आहे. येथील हजारो नागरिकांवर प्राथमिक उपचार करून त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे रुग्णांना घरच्या घरीच मोफत प्राथमिक उपचार मिळत आहे.
जितीन सक्सेना, महाव्यवस्थापक (मानव संसाधन), गेल इंडिया लिमिटेड, उसर