समाज कल्याण अधिकारी लाच घेताना अटक

| सातारा | वृत्तसंस्था |

सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांना सांगलीत लाच घेताना अटक करण्यात आली. सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सपना घाळवेंकडे होता. त्यांनी शिक्षण संस्थेकडे लाच मागितली. सांगलीतील समाज कल्याण कार्यालयात लाचलुचपत विभागाने कारवाई करत लाच मागणाऱ्या निरीक्षकलाही ताब्यात घेतले.

याबाबत तक्रारदार असलेल्याची एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी 59 लाख 40 हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचा पहिला हप्ता 29 लाख 70 हजार रुपये शाळेला दिला आहे. पहिला हप्ता दिल्याचा मोबदला म्हणून दहा टक्के व दुसरा हप्ता देण्यासाठी दहा टक्के रक्कम मिळून सहा लाख रुपये लाचेची मागणी घोळवे यांनी केली. त्यांच्याकडे सांगलीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.

लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार संस्थेच्या पदाधिकारी यांनी 5 जून रोजी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये घोळवे यांनी सहा लाख रुपये लाच मागितली. चर्चेअंती पाच लाख रुपये व त्यानंतर अडीच लाख रुपये लाचेची मागणी करत पहिला हप्ता एक लाख रुपये लगेच घेऊन येण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना घोळवे यांना रंगेहाथ पकडले. तर, याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रमशाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून दहा हजार लाचेची मागणी केल्याबद्दल अटक केली आहे.

Exit mobile version