| कर्जत | प्रतिनिधी |
प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे श्री दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी हजारो भाविकांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री दत्तजयंतीनिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, सकाळी महा अभिषेक, श्रीदत्तयाग, दुपारी महाआरती, महाप्रसाद तसेच दुपारी हृषीकेश अभ्यंकर यांनी अभंगरंग हा गायनाचा कार्यक्रम सादर केला. त्यांना संवादिनीवर ऋतुजा कर्वे, तबल्यावर चैतन्य भागवत, पखवाज रोहन पाटील आणि विशाल निगुडकर तसेच साईड-हीदमवर योगेश देशमुख यांनी साथ संगत केली.
या कार्यक्रमादरम्यान नेत्रदानासाठी जनजागृती करणारे आणि नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय हरिश्चंद्रे आणि अभिनयाबरोबरच गेली वीस वर्षे पनवेलच्या शांतीवन आश्रमात वयोवृद्ध आजी-आजोबा व कुष्ठरोगी रूग्णांना दिवाळी भेट देऊन दिवाळी साजरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, प्राणीमित्र सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी यांचा श्री स्वामी समर्थ परिवारातर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.







