शेतकर्‍यांनी बांधला मातीचा बंधारा

| खरोशी | वार्ताहर |

पेण तालुक्यातील खरोशी येथे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेंतर्गत बाळगंगा नदीच्या मधोमध खरोशी व दुरशेत गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येत श्रमदानाने मातीचा बंधारा बांधला आहे. यासाठी शासनाचा कोणताही निधी घेण्यात आलेला नाही.

फावडे, टिकाव व घमेले घेत महिला व पुरूष मंडळी या बंधार्‍याच्या कामात मग्न होते. या बंधार्‍याचे उद्घाटन खरोशी सरपंच रूपाली पाटील, दुरशेत सरपंच दशरथ गावंड यांनी नारळ फोडून केला. यावेळी दोन्ही सरपंचांनी प्रत्येकी पाच-पाच हजार रूपये ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकर्‍यांना देण्याचे जाहीर करून त्यांना शभेच्छा दिल्या. यावेळी कृषी संशोधक के.डी. पाटील, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई भोंडकर, ए.पी.पाटील, भरत पाटील, जनार्दन पाटील, महेश पाटील यांनी भेट दिली.

पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत बंधारा बांधून भाजीपाल्याचे उत्पन्न नक्कीच वाढणार आहे. मातीचा बंधारा बांधून पाणी साठवणूक केली असली तरी याचा फायदा शेतकर्‍यांना नक्की झालेला दिसून येईल.

के.डी. पाटील
कृषी संशोधक

गेली अनेक वर्ष हा बंधारा मातीचा बांधला जात आहे. परंतु, महापुराचा फटका त्याला बसून तो वाहून जातो. यासाठी शासनाकडे बंधारा पक्का बंधारा बांधून घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तो पूर्णत्वास कसा जाईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार.

सरपंच रूपाली पाटील / दशरथ गावंड
Exit mobile version