वाहनतळाच्या नावाखाली माती उत्खनन

घोडेवाल्यांच्या जागेवर फिरवला जेसीबी; वन-महसूल विभागाची डोळ्यावर पट्टी

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरानमध्ये वन विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर बेकायदा उत्खनन सुरू आहे. शहरातील वाहनतळ समस्येचे कारण पुढे करून दस्तुरी येथील वाहन तळाच्या ठिकाणी बेकायदा जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. दरम्यान, तेथील मालवाहू घोड्यांचे उभे राहण्याचे ठिकाण हिरावले गेले असून, घोडेवाल्यांचे तबेले तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त घेऊन येणारे वन विभाग आता आहे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माथेरान या ठिकाणी देशासह विविध देशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. माथेरान हे पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरण पूरक थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहनाला बंदी आहे. त्यामुळे माथेरानमध्ये उपलब्ध असणारे वाहन तळ हे पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी अपुरे पडत आहेत. पर्यटकांना माथेरान घाट रस्त्यात, तर काही पर्यटकांना जुम्मापट्टी या आदिवासी वाडीमध्ये आपली वाहने उभी करून पुढे माथेरान येथे प्रवासी टॅक्सीने जावे लागते. माथेरानच्या वाहन तळाला लागून असलेला एमपी 93 हा प्लॉट शासनाच्या मालकीचा आहे. या भूखंडाचे सपाटीकरण जेसीबीचा वापर करून करण्यात आले आहे. हा भूखंड माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरण झालेला नाही आणि तरीदेखील खोदकाम केले गेले आहे. याबाबत वन विभाग आणि महसूल विभाग यांनी कोणतीही कारवाई केली नाही. वाहन तळाच्या नावाखाली सपाटीकरण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एमपी 93 या प्लॉटमध्ये एक जुने इमारत होती. ती इमारत आता वाहन तळाच्या जागेसाठी तीन जेसीपी यांच्या सहाय्याने पाडण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन देखील झाले. मात्र, यावर वन आणि महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. तसेच, या ठिकाणी जे मालवाहतूक घोडेस्वार उभे राहायचे त्यांना देखील या ठिकाणावरून हटविण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत माथेरानमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

शासनाची बघ्याची भूमिका
एमपी 93 हा प्लॉट महसूल विभागाच्या ताब्यात असून माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेच्या ताब्यात दिलेला नाही. मात्र, तरी देखील या प्लॉटमध्ये सध्या काम चालू असल्याने शासन कोणतीही कारवाई करीत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन फक्त बघ्याची भुमिका घेत असल्याच्या चर्चा माथेरानकरांमध्ये सुरू आहेत.
Exit mobile version