पाणी 30 टक्क्याने कमी करण्याची कार्यवाही
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेले रायगड जिल्हा परिषदेच्या जामरुख येथील पाझर तलावातून शनिवारपासून विसर्ग सुरू आहे. पाझर तलावाच्या मुख्य बांधामधून पाण्याची गळती सुरू असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा साठा कमी करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दरम्यान, तलावातील पाण्याचा गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग सुरू असून, ज्या भागातून विसर्ग सुरू आहे, त्याच भागात गळती सुरू असल्यानेदेखील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जामरुख पाझर तलाव दुरुस्ती करण्यात आल्यानंतर सांडवा वाढविण्यात आला आणि त्यानंतर पाझर तलावातील पाण्याची क्षमता 580 दशलक्ष घनमीटर झाला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आणि पाझर तलावातील पाण्याची गळती वाढली आहे. त्यानंतर कर्जत तालुक्यातील प्रशासनाने 21 आणि 22 जुलै रोजी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे पाझर तलावावर पोहोचले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाझर तलावातील पाण्याची पातळी कमी करण्याचा निर्णय घेतला. आ. महेंद्र थोरवे आणि तहसीलदार डॉ. विजय रसाळ यांनी त्या निर्णयाची कार्यवाही करण्याचे आदेश लघु पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यानुसार लघुपाटबंधारे विभागाचे अभियंता यांच्याकडून पाझर तलावाची तळाशी असलेल्या भागातील विहिरीमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आठ एकरात असलेल्या या पाझर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रविवारी दुसऱ्या दिवशीही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मात्र, ज्या परिसरातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अगदी त्याच भागातून सर्वात जास्त पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा आमच्यासाठी धोका वाढविणारी बाब आहे, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना सांगितली आहे. तर, ग्रामस्थांनी प्रशासनाला धरणाचे ऑडिट करण्याची नव्याने मागणी केली होती. त्यात गेली अनेक वर्षे धरणाचे ऑडिट केले नसल्याने पाझर तलावाची सद्यःस्थिती काय आहे हे कळणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार, सोलनपाडा येथील जामरूख पाझर तलावाचे शासनाकडून ऑडिट केले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. मेरी या शासनाच्या अधिकृत संस्थेकडून धरणाच्या एकूण स्थितीचे ऑडिट करण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक सर्व प्रयत्न प्रशासन करेल, असे आश्वासन प्रशासनाच्यावतीने तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
पुनर्वसनासाठी ग्रामस्थ ठाम
सोलनपाडा आणि जामरुख या गावातील रहिवाशांचे अन्य ठिकाणी स्थलांतरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सोलनपाडा येथील 31 घरांमधील 42 कुटुंबं आणि जामरुख येथील 85 घरांचे पुनर्वसन शासन करणार असेल तर ते याच परिसरात शासनाच्या जमिनीवर करावे, याबाबतदेखील ग्रामस्थ आग्रही आहेत.