सोलापूरकर पठ्ठ्या आयपीएल गाजवणार

अर्शीन कुलकर्णीसाठी लखनऊने मोजले 20 लाख


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दुबईमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून केलेल्या चमकदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेला सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णीला आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी लखनऊ सुपर जायन्ट्स संघात संधी दिली आहे. मंगळवारी दुबईत झालेल्या आयपीएल लिलावामध्ये अर्शिन कुलकर्णीला वीस लाखांमध्ये विकत घेतले आहे. ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा मुलगा असलेला अर्शीन हा वयाच्या सहाव्या वर्षापासून क्रिकेट धडे गिरवत यशस्वीपणे दमदार वाटचाल करीत आहे.

सोलापुरातून 14 वर्षाखालील मुलांच्या संघात जिल्हा संघाकडून खेळताना अर्शिनने बालपणातच त्याच्या फलंदाजीने क्रिकेटमधील चुणूक दाखवून दिली होती. त्याच्या पालकांनी पुणे येथील केडन्स क्रिकेट ॲकॅडमीमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी पाठविले, तिथे त्याला वरिष्ठांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. त्याच आधारे मागील 2 वर्षे तो महाराष्ट्राच्या 16 आणि 19 वर्षाखालील संघाकडून खेळत आहे. त्याच खेळाच्या जोरावर त्याची महाराष्ट्र प्रिमिअर लीगमध्ये निवड झाली. त्यातच त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चुणूक दाखवली. त्यामुळे त्याला यावर्षी महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात सय्यद मुश्ताक अली चषकासाठी निवडण्यात आले. त्या स्पर्धेतदेखील त्याने चमकदार कामगिरी केली होती.

अर्शिनने 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी व गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Exit mobile version