भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा
| सोलापूर | प्रतिनिधी |
अंध महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले आहे. या विश्वचषक स्पर्धेत सोलापूरच्या गंगा कदमने अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. गंगा कदमच्या या कामगिरीमुळे सोलापूरचा लौकीक आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील उंचावला आहे.
गंगा कदम हिचे वडील सालगडी म्हणून राबतात. गंगा कदम हिने तीन गडी बाद केले. याशिवाय तिने सहा फलंदाज धावबाद केले. पहिल्याच सामन्यात तिने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंगाने सलामीला फलंदाजी करत येत 31 चेंडूत 3 चौकारांच्या साह्याने नाबाद 41 धावा केल्या. तसेच 2 षटकांमध्ये 5 धावा दिल्या व एक षटक निर्धाव टाकले. हीच कामगिरी भारतीय संघाला विजेतेपदापर्यंत घेऊन गेली. “भारताच्या विश्वचषक विजयात माझी शिष्य असलेल्या गंगा कदम हिचा बहुमूल्य वाटा आहे. एक प्रशिक्षक म्हणून तिच्या माध्यमातून माझे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद मला होत आहे”, असे तिचे प्रशिक्षक राजू शेळके यांनी सांगितले.







