सैनिक विश्रामगृह बनला भूत बंगला

सैनिकांची अवहेलना, झाडाझुडपांचा विळखा; शासनाच्या दुर्लक्षामुळे अखेरची घरघर

। माणगाव । वार्ताहर ।

ज्यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले, छातीवर बंदूकीच्या गोळ्या झेलल्या, ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यांची तमा न बाळगता शहीद झाले, देशासाठी हुतात्मा झाले त्या आजी आणि माजी सैनिकांच्या माणगाव येथील सैनिक विश्रामगृहाची अत्यंत दयनीय आणि दुर्दशा झाली असून आधार देणारे विश्रामगृह भूत बंगला बनला आहे. या डाक बंगल्याला अखेरची घरघर लागली आहे. शासनाने याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून सैनिकांची अवहेलना सुरू ठेवली आहे.

जसे युद्ध प्रसंगी दुसर्‍या देशाचे सैनिक घेरतात तसेच या विश्रामगृहाला झाडा झुडपांनी घेरुन विळखा घातला आहे. त्यामुळे पडझड झाली आहे. सर्वत्र दाट गवत आणि वेलींचे साम्राज्य पसरले आहे. दरवाजे, खिडक्या, तावदाने तुटलेल्या अवस्थेत आहेत. छप्पर उडालेले आहे. कौले उडून फुटलेली आहेत. संपूर्ण इमारत मोडकळीस आलेली आहे. लोखंडी प्रवेशद्वार गंजून मोडकळीस आले आहे. संरक्षक भिंतींचीही नासधूस झाली आहे.

पाच वर्षांपूर्वी विश्रामगृहाची तात्पुरती डागडूजी करण्यात आली होती. तत्कालीन मंत्र्यांनी अनेकवेळा विश्रामगृह बांधण्यासाठी प्रयत्न केला आणि निधीही उपलब्ध करून दिला होता. परंतु अद्यापही या विश्रामगृहाला विळखा घालणारे एकही पान हललेले नाही. नाही चिरा, नाही पणती अशी भयंकर आणि भयाण दुरवस्था झाली आहे. शासनाने हे विश्रामगृह बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारची हालचाल केलेली दिसत नाही. त्यामुळे सैनिकांची भीक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था झाली आहे. कुणी घर देता का घर याप्रमाणे सैनिक निराधार आणि ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे. शासकीय सैनिक विश्रामगृह, पोलीस ठाणे, व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते वीर यशवंतराव घाडगे स्मारक आणि काळ नदीवरील पूल या वास्तू ऐतिहासिक ठेवा म्हणून सुरक्षित राहण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. या सर्व वास्तू 1871 ते 1891 च्या काळात इंग्रजांनी बांधलेल्या आहेत. या चार वास्तूंपैकी केवळ याच सैनिक विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून ते कालांतराने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

25 वर्षांपूर्वी याच विश्रामगृहात सैनिक आणि पोलीस भरती होत असे. कॅन्टीन सुरू होती. त्यामध्ये स्वस्त वस्तू मिळत असत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आंदोलने, मोर्चे, सभा, बैठका होत असत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या ऐतिहासिक विश्राम गृहात बळ देण्याचे काम सुरू झाले होते. आता या ऐतिहासिक वारशाचे भूत बंगल्यात रुपांतर झाल्याने सैनिकांनी दिलेले बलिदान आणि पत्करलेले हुतात्म्य व्यर्थ गेले आहे असे माजी सैनिकाने सांगितले.
दरवर्षी 9 जानेवारी रोजी आजी आणि माजी सैनिकांचा मेळावा वीर यशवंतराव घाडगे जयंती निमित्त निमित्ताने होत असतो. त्यावेळी मोठमोठे पुढारी, मंत्री, खासदार, आमदार, उच्च पदस्थ मिलीट्री अधिकारी आश्‍वासने आणि वचने देऊन जातात. प्रत्यक्षात काहीच होत नाही हे वास्तव आहे. जसे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा मायभूमीसाठी प्राण तळमळला होता तसेच प्राण हे विश्रामगृह नव्याने बांधण्यासाठी तळमळत आहे. या सर्व सुविधा होण्यासाठी सैनिक संघटनेने निवेदने दिली मात्र आतापर्यंत काहीच झालेले नाही. बाजूला सरकारी अधिकारी यांचे शासकीय बंगले आणि इमले उभारण्यात येत आहेत. मात्र सरकारच्या तिजोरीत सैनिकांच्या कल्याणकारी वास्तूसाठी एक छदाम नसावा यांचे आश्‍चर्य आणि नवल आहे.

Exit mobile version