सैनिकांची दिवाळी होणार गोड

पीएनपीच्या विद्यार्थ्यांनी पाठविला फराळ, भेटवस्तू

| अलिबाग | प्रतिनिधी |

दुर्गम भागात, प्रतिकूल वातावरणात सीमांच्या रक्षणासाठी हजारो सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यामुळे सणासुदीतील आनंदापासून वंचित राहणाऱ्या सैनिकांना दिवाळीचा फराळ पाठवण्याचा उपक्रम वावोशीच्या पीएनपी शाळेकडून राबविण्यात आला. चिवडा, चकळी, लाडू, शंकरपाळी आदी पदार्थांचे बॉक्स व भेटवस्तू आदी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवण्यात आले आहेत.

पीएनपी शाळा वावोशी यांनी देशसेवा करणाऱ्या श्रीनगर येथील सैनिकांसाठी दिवाळी फराळ बनवून पाठविला आहे. श्रीनगर येथील सैनिक कार्यालयात हा फराळ पोस्टाने पाठविण्यात आला असून, तो पुढे सैनिकांना वाटण्यात येणार असल्याने सांगण्यात आले आहे. आपण बणविलेला फराळ सैनिकांना खायला मिळणार असल्याने त्याचा आनंद पीएनपी शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनासुद्धा मिळाला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कोणासोबत तरी दिवाळी साजरी करावी हा विषय तर कायमच मनात होता. आम्ही दरवर्षी अनाथ मुलांच्या शाळेत, वृध्दाश्रमात, आदिवासी वाडी वस्तीवर अशा ठिकाणी दिवाळी सण साजरा करतो. यंदा आपण देशसेवा करणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करावी, अशी संकल्पना मनात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम फुलारी यांनी सांगितले.

दिवाळी फराळ देशसेवा करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी पाठवित आहोत याचा आनंद वाटत आहे. देशाचं रक्षण करणारे आपले वीर जवान मात्र ही दिवाळी त्यांच्या नातेवाईकांसोबत साजरी करू शकत नाहीत. त्यामुळे त्याच्या कार्याची, कष्टांची जाण ठेवत त्यांना पी.एन.पी. शाळेतर्फे फराळ पाठविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सैनिकांप्रती प्रेम, आदर व देशभक्ती जागृत होईल.

पूनम फुलारी, मुख्याध्यापिका, पीएनपी शाळा वावोशी
Exit mobile version