सैनिकांचे विश्रांती गृह मोजतोय अखेरची घटका

निधीअभावी इमारतीला भूतबंगल्याची अवकळा

| माणगाव | प्रतिनिधी |

स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात, कचेरी रोडलगत विद्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेले सैनिक विश्रांती गृह आज शासनाच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः अखेरची घटका मोजत आहे. एकेकाळी गजबजलेले, शिस्तीचे आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक ठरलेले हे विश्रामगृह आज मात्र निधी अभावी जीर्ण झाले असून, त्याला जणू भूत बंगल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेली अनेक वर्षे या विश्रामगृहाची किमान डागडुजी तरी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक माजी सैनिक, नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, या मागण्यांकडे शासन आणि संबंधित विभागांकडून ठोस दखल घेतली गेलेली नाही. सैनिक कल्याण विभाग आणि इतर प्रशासकीय यंत्रणांमधील कागदोपत्री नियम, कायदे आणि विभागीय अडथळ्यांमध्ये हा निधी अडकून पडला असून त्याची झळ थेट या ऐतिहासिक इमारतीला सहन करावी लागत आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी केवळ संरक्षण भिंती उभारण्यात आल्या. मात्र, मूळ सैनिक विश्रांती गृहाच्या नूतनीकरणाचा किंवा पुनर्बांधणीचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला. आज या इमारतीच्या परिसरात उंचच उंच झाडे झुडपे, गवत वाढले असून, भिंतींमधील दगड-वीटा ढासळू लागल्या आहेत. खिडक्या-दरवाजे मोडकळीस आले असून, छताची आणि भिंतीची अवस्था धोकादायक बनली आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकेकाळी या सैनिक विश्रांती गृहात सैनिक व पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रचंड गर्दी होत असे, विविध सामाजिक आणि प्रशासकीय सभा- बैठका येथे पार पडत. माजी सैनिक विश्रांतीसाठी येथे मुक्काम करत असत. आज मात्र तेच विश्रामगृह ओसाड, भयावह आणि उपेक्षित अवस्थेत उभे आहे. ज्या सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढा दिला, काहींनी मातृभूमीसाठी हसत हसत शहिदी पत्करली, काहींनी स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्याच सैनिकांच्या सन्मानार्थ उभारलेली ही इमारत आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अखेरची घटका मोजत आहे, हे वास्तव अत्यंत वेदनादायक आहे.

दरवर्षी 9 जानेवारी रोजी देशातील पहिले व्हिक्टोरिया क्रॉसपदक विजेते वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी येथे भेट देतात. भाषणे होतात, आश्वासने दिली जातात. मात्र, त्या आश्वासनांची पूर्तता होत नाही. कार्यक्रम संपतो, फलक काढले जातात आणि पुन्हा या विश्रामगृहाच्या वाट्याला येते ते केवळ अंधार, दुर्लक्ष आणि शांतता. ना चिरा ना पणती अशी अवस्था आज या ऐतिहासिक सैनिक विश्रांती गृहाची झाली आहे. देशसेवेचे प्रतीक असलेल्या या वास्तूचे जतन आणि पुनरुज्जीवन होणे, ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा इतिहासाच्या पानांत केवळ नोंद राहील की, एकेकाळी सैनिकांच्या सन्मानासाठी उभारलेले विश्रांती गृह प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काळाच्या पडद्याआड गेले.

Exit mobile version