ग्रामीण प्रगती फॉऊंडेशनच्या माध्यमातून राबविणार घनकचरा व्यवस्थापन

120 तरुणांना प्रशिक्षण आणि रोजगार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी घनकचर्‍याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे आणि यासाठी ग्रामीण प्रगती फॉऊंडेशन ही सामाजिक संस्था पुढाकार घेत आहे. एवढेच नव्हे तर या माध्यमातून 120 सुशिक्षित तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्याचा मानस आहे, अशी माहिती फॉऊंडेशनचे संस्थापक देवांग नेराल्ला यांनी दिली.
मुंबईतील ग्रामीण प्रगती फॉऊंडेशन ही सामाजिक संस्था गेली सात वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आजवर अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले गेले आहेत. त्यामध्ये सध्या कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण आणि इतर काही उपक्रमांचा समावेश आहे. ही संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी देखील काम करते. त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणजे घनकचरा व्यवस्थापन हा असल्याचे देवांग नेराल्ला यांनी सांगितले.
या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुशिक्षित तरुणांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. हे तरुण किमान पदवीधर असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या तरुणांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी साठी फॉऊंडेशन च्या वतीने शिफारस केली जाईल. असे ही देवांग नेराल्ला यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण प्रगती फॉऊंडेशन चे मुख्यकार्यकारी अधिकारी मंगेश डफळे उपस्थित होते.

Exit mobile version