मांजात अडकून जातोय नाहक बळी
| पाताळगंगा | वार्ताहर |
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सर्वत्र पंतगबाजीला जोर चढत असून, मांजाची सर्वत्र विक्री सुरू असल्याने पक्ष्यांच्या जीवावर यंदाही संक्रांत येणार आहे. यामुळे पक्षीप्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. जानेवारी महिन्याची चाहूल लागताच अनेकांना वेड लागते ते पंतगाचे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत अनेक प्रकारच्या पतंगांची विक्री होत असून, पतंग मांजासह दाखल झाले आहेत. परंतु, या पतंगबाजीसाठी वापरण्यात येणारा मांजा हा अनेकवेळा पक्ष्यांच्या जीवावर बेतणारा ठरत असल्याचे दृश्य दरवर्षी पहावयास मिळत आहे.
पतंगांच्या काटाकाटीमध्ये आपणच जिंकावे या उद्देशाने अनेकजण मांजाचा वापर करतात. यामुळे या धाग्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. या स्पर्धेत पक्ष्यांना इजा पोहोविण्याचा कोणाचाही उद्देश व हेतू नसतो; परंतु आकाशात लांब गेलेल्या पतंगाच्या मांजामध्ये पक्षी अडकून त्यांना इजा होण्याचा संभव असतो. त्यामुळे यंदा पतंग उडविताना चायनीज अगर कोणताही धारदार मांजा न वापरता सुती दोरा वापरून पतंग उडवावेत, असा सल्ला पक्षीमित्र देत आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने बाजारात सध्या वेगवेळ्या रंगाच्या, आकाराचे पतंग दाखल झाले आहेत. आकाशात पतंगांची गर्दी असते. संक्रांत एक दिवसांची असली तरी पतंगबाजी महिनाभर चालते. पतंग मांजासह झाडांच्या फांद्यात अथवा विजेच्या तारांमध्ये राहिल्यामुळे त्याच्या संपर्कात आल्यास पक्षी आणि छोटे प्राणी यामध्ये जायबंध होतात किंवा जीवाला मुकतात. हे टाळण्यासाठी पतंगबाजीची मजाही लुटता आली पाहिजे आणि प्राणी व पक्षी यांचा जीवही वाचला पाहिजे, असे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंदा पतंगांच्या शौकिनांनी साध्या सुती धाग्याचा वापर करावा म्हणजे त्यांचा शौक पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही, असे आवाहन पक्षी आणि पर्यावरणप्रेमी करीत आहे.