माणगावात पथदीप बंद, अनियमित पाणीपुरवठयासह स्वच्छतेचाही प्रश्न ऐरणीवर
| माणगाव | प्रतिनिधी |
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा सण! प्रत्येक घरासमोर आकाशकंदील, पणत्यांची आरास आणि विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघत असताना माणगाव शहरातील अनेक सार्वजनिक रस्ते मात्र अंधाराच्या सावलीत हरवले आहेत. घराघरांत दिवाळीचा उत्साह असला, तरी बंद पथदीप, अनियमित पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेच्या समस्यांमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत आहे. सणासुदीच्या काळातही मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने माणगाव नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
दसऱ्याच्या काळातही शहरातील अनेक भाग अंधारात होते. दिवाळीच्या तोंडावर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत गल्ल्या, चौक आणि छोट्या नाक्यांपर्यंत अनेक ठिकाणी पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खांदाड परिसरातील मराठी शाळेपासून डोंगरे यांच्या निवासस्थानापर्यंतचा रस्ता, अमरदीप हॉस्टेलच्या मागील बाजूपासून बाळा डीजे पॉवर यांच्या निवासस्थानापर्यंतचा मार्ग तसेच मोरबा रोडवरील वेदपाठक यांच्या निवासस्थानापर्यंतचा परिसर अंधारात असल्याचे चित्र आहे. जुन्या होळीच्या मैदानापासून शेलार यांच्या निवासस्थानापर्यंतही काही मोजकेच दिवे सुरू असल्याचे दिसून आले. खांदाडमधील पथदीप सायंकाळी सुरू झाल्यानंतर वारंवार बंद-चालू होत अखेर बंद पडल्याची तक्रार आहे. रात्री उशिरापर्यंत ते पुन्हा सुरू झाले नव्हते. विशेष म्हणजे, नागरिकांच्या घरांवरील रोषणाईचा प्रकाश रस्त्यांवर पडत असल्याने काही प्रमाणात उजेड मिळतो. मात्र, सार्वजनिक रस्ते उजळविण्याची जबाबदारी नागरिकांच्या घरातील दिव्यांनी पार पाडायची का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
पथदीपांबरोबरच पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेनेही नागरिक त्रस्त आहेत. गुरुवार, दि.5 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा होणार नसल्याचा संदेश सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप समूहांवर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मागील काही आठवड्यांपासून निर्धारित वेळेत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. याबाबत पाणीपुरवठा सभापती अजित तार्लेकर यांनी पाणी साठवणूक पंपगृहातील यंत्रणेत बिघाड झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही प्रभागांतील पाणीपुरवठा बाधित झाला. यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी कर्मचारी चोवीस तास काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दिवाळीसारख्या सणात शहरातील रस्ते, गटारे, सार्वजनिक ठिकाणे आणि अंतर्गत परिसर स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, स्वच्छतेबाबतही नागरिकांकडून तक्रारी व्यक्त होत आहेत. सणासुदीच्या काळात विशेष स्वच्छता मोहीम राबवून माणगाव शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची आवश्यकता आहे.
नगरपंचायतीकडून घरपट्टी, पाणीपट्टी आणि अन्य करांची वसुली नियमित केली जाते. नागरिकही आपली आर्थिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतात. मग त्या बदल्यात नियमित पाणीपुरवठा, प्रकाशमान रस्ते आणि स्वच्छ परिसर मिळणे हा नागरिकांचा हक्क आहे. नगरपंचायत प्रशासनाने बंद पथदीप तातडीने सुरू करावेत, नादुरुस्त दिव्यांची नियमित तपासणी करावी, पाणीपुरवठा यंत्रणा युद्धपातळीवर पूर्ववत करून निश्चित वेळापत्रकानुसार पाणी द्यावे आणि शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.






