सोमाटणे ग्रामपंचायत इंडिया आघाडीच जिंकणार

| पनवेल | रुपाली घरत-वर्तक |

पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सोमाटणे ग्रुप ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा झेंडा फडकवायच्या इराद्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या शेकाप, शिव सेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआय इंडिया आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीकडून थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढत असलेल्या उमेदवार दिव्या शशिकांत मुंढे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सरपंच पदासोबतच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास सरपंच पदाच्या उमेदवार दिव्या मुंढे यांनी व्यक्त केला आहे.


सोमाटणे, दहिवली आणि नारपोली या तीन गावातील जवळपास दोन हजार मतदार संख्या असलेल्या सोमाटणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत तीन प्रभाग असून तीन प्रभागातून इंडिया आघाडीकडून थेट सरपंच पदाच्या उमेदवारासोबत सदस्य पदासाठी 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सोमाटणे ग्रुप ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे कायमच वर्चस्व राहिले आहे. शेकापच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. असे असतानाही ग्रामपंचायत हद्दीतील काही भागात असलेला अपुऱ्या पाणी पूरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सरपंच पदाच्या उमेदवार दिव्या मुंढे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गावातील सांडपाण्याचा प्रश्न, महिलांचे प्रश्न सोडवण्याकरिता देखील प्रयत्न करणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.


ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी गावाच्या जमिनीवर स्वतःचे आणि कुटुंबाचे नाव लावून ती विकण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना आपण निवडून देणार आहात का? असा सवाल उपस्थित करत इंडिया आघाडीच्या सर्वांच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन देखील थेट सरपंच पदाच्या उमेदवार दिव्या मुंढे यांनी मतदारांना केले आहे.

सरपंच पदाच्या उमेदवार यांच्यासोबत सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी शेकाप इंडिया आघाडीकडून जवळपास सर्वच नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्र. एकमधून गॅस स्वरा रोहन मुंढे या उच्च शिक्षित उमेदवार आहेत. सोमाटणे ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत इंडिया आघाडीकडून प्रभाग क्र. एकमधून जगदीश विठ्ठल गायकर, अर्चना गंगाराम पाटील, दीपिका दीपक म्हसकर, प्रभाग क्रमांक दोनमधून मनोज नथुराम पाटील, अस्मिता अनिल पाटील, स्वरा रोहन मुंढे तर प्रभाग क्रमांक तीनमधून आत्माराम मुंढे, सुशांत जनार्धन पाटील आणि सुरेखा सुरेश मुंढे हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सोमाटणे, नारपोली, दहिवली गावात गरजेपुरती बांधलेली घरे गावठाण विस्तार करून ती नियमित करून देणार. तसेच त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देणार. निराधार महिला पुरुष तसेच 60 ते 65 वर्षांवरील वयोवृद्ध व्यक्तींना दर महिना पेन्शन चालू करण्याचा प्रयत्न करणार असून ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे, याकरीता नियोजन करण्यात येईल. गावातील रस्ते, सांडपाणी, गटारे यांचे योग्य पद्धतीने नियोजन करून राहिलेली कामे निश्चितच लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत.

गावच्या जमिनीवर स्वतःची नावे लावणारा सरपंच पाहिजे की, गावाची जमीन गावाला मिळवून देणारा, गावासाठी काम करणारा, समाजहिताचा विचार करणार सरपंच हवा? हे आता गावातील मतदारच ठरवतील.

दिव्या शशिकांत मुंढे, थेट सरपंच पदाच्या उमेदवार
Exit mobile version