जागतिक पातळीवर करोनाचा नवा स्ट्रेन!
। पुणे । वृत्तसंस्था ।
राज्यात 1 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची परवानगी सरकारनं दिली असतानाच, जागतिक पातळीवर करोनाच्या नव्या स्ट्रेनची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. मकाही बंधनं पुन्हा आणावी लागतील असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळं काय बंधनं येणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. दिवाळीनंतर आज पहिल्यांदाच अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. ‘नाट्यगृह, इतर कार्यक्रम व शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कोविडचे नियम पाळूनच सर्व काही करावं लागेल’. ‘जागतिक स्तरावर पसरत असलेल्या नवीन व्हेरीएन्टच्या संदर्भात वेगवेगळी मतं आहेत. राज्यात नेमकी काय खबरदारी घेता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे देशांतर्गत विमान प्रवास केल्यानंतर विमानतळावरील तपासणी संदर्भातील काही नियम बनविण्यात आले आहेत. विदेशातून येणार्या लोकांना केंद्र सरकारच्या नियमावलींचं पालन करावं लागेल’, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. नवीन व्हेरीएन्टचा धोका असल्यामुळे पुणे तसंच पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर सुरूच राहणार आहेत आणि 31 डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
एसटी संपावर पवार म्हणाले…
एसटी संपाच्या बाबतीतही अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. ‘अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यासह इतर सहकार्यांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. कुठलीच गोष्ट तुटेपर्यंत ताणायची नसते. एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांचा विचार करत असताना प्रवाशांना होणार्या त्रासाचा विचार करावा लागेल. आजूबाजूच्या राज्यांतील महामंडळांचा अभ्यास करून एस टी बाबत निर्णय घेण्यात आला आहे. आता हा विषय संपवला पाहिजे,’ असं अजित पवार म्हणाले.