| महाड | उदय सावंत |
लेह-मनाली राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने अनेक प्रवासी रस्त्यात अडकले असून, अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांची स्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. यामध्ये महाड शहरातील अमोल महामुणकर, समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांचे परिवार सदस्य असे एकूण 9 जण गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने येथील रस्त्यावर प्रचंड कडाक्याच्या थंडीत अडकलेले आहेत.
थंडीचे प्रमाण इतके आहे की सध्या तापमान 2 अंश सेल्सियसपर्यंत खाली घसरले आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव असून, अनेक जण उपाशी अवस्थेत आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे महामार्ग मोकळा होण्याचा काही निश्चित अंदाज सांगू शकत नसल्याचे अमोल यांनी सांगितले आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी तसेच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत तातडीने अन्न, औषधं आणि गरम कपड्यांची मदत पोहोचवावी अशी कळकळीची मागणी होत आहे. परंतु, पर्यटकांजवळ स्थानिक महाडच्या नागरिकांनी संपर्क केला असता धिम्या गतीने वाहतूक सुरू झालेली आहे असे महाडचे अडकलेले पर्यटक यांनी सांगितले आहे.