उरणमधील कांदळवनांचा लवकरच विकास

| पनवेल | प्रतिनिधी ।
देशाच्या भविष्यासाठी विकास आवश्यक आहे, पण तो शाश्‍वत विकास असावा, भविष्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. उरण तालुक्यातील कांदळवनांसाठी एक हजार हेक्टर क्षेत्र मंजूर झाले आहे. आता ते विकसित करण्यासाठी लवकरच सुरुवात होईल. तालुक्यात खेकडे, जिताडा व मासे उत्पादनासाठी वन विभागाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन उरण वन विभागीय अधिकारी कोकरे यांनी दिले.

वीर वाजेकर महाविद्यालय, प्राणिशास्त्र विभागाच्या विद्यमाने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. आमोद ठक्कर यांनी केले. तालुक्यातील कांदळवनांची संख्या घटत आहे. तालुक्यातील सागरी जैव विविधता टिकविण्याची आवश्यकता आहे. जमिनीची धूप थांबविणे, प्राणवायू पुरविणे, औषधांसाठी वृक्षांची गरज आहे. निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी तरुणाईचा पुढाकार आवश्यक आहे. तालुक्यात रोजगारनिर्मिती करण्यासाठी कांदळवने महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात, असे कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आणि अलिबाग कांदळवन कक्षाच्या निमिषा नारकर यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, डॉ. श्रेया पाटील, प्रा. पंकज भोये, प्रा. मयुरी मोहिते, किशोर जोशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version