एनडीए आघाडीचा पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने कारवाई केल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि सहयोगी पक्षांच्या सरकारवर टांगती तलवार होती. भाजपा इतर राज्यांप्रमाणे याही राज्यात खेळी करण्याच्या तयारीत आहे, असा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाकडून केला गेला. सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर शुक्रवारी चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर सोमवारी झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी प्रस्तावावर मतदान झाले. झारखंड मुक्ती मोर्चाने 47 मते मिळवत हा प्रस्ताव जिंकला, तर बहुमत चाचणीच्या विरोधात केवळ 29 मते पडली.
कथित भ्रष्टाचार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासादरम्यान हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. केंद्रातील भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वी कमकुवत करण्यासाठी जाणूनबुजून झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाला लक्ष्य केले आहे, असा आरोप हेमंत सोरेन यांनी केला होता. झारखंड विधानसभेत 81 सदस्य असून, बहुमताचा आकडा 41 आहे. भाजपला माझं आव्हान आहे की, माझ्यावर केले गेलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करावेत. जर माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल, फक्त राजकारण नाहीतर मी झारखंड सोडून देईल. केंद्राच्या कारस्थानानंतर माझ्या अटकेत राजभवनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा गंभीर आरोप हेमंत सोरेन यांनी केला आहे. दरम्यान, ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान करण्याची मुभा दिली. यावेळी विधानसभेत भाषण करत असताना हेमंत सोरेन यांनी भाजपा सह राजभवनावरही आरोप केले. 31 जानेवारी हा दिवस लोकशाहीतला काळा दिवस ठरला असल्याचे म्हटले. याआधी कुठल्याही मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे अटक झाल्याचं माझ्या ऐकिवात नाही. या सगळ्या प्रकारात कुठे ना कुठे राज्यपालांचाही सहभाग आहे, असा थेट आरोप हेमंत सोरेन यांनी विधानसभेत बोलताना केला.