दक्षिण आफ्रिकेची बांगलादेशवर मात

सुपर-आठमधील प्रवेश निश्‍चित

। न्युयॉर्क । वृत्तसंस्था ।

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्‍वचषकात सुपर-8 च्या शर्यतीत अनेक मोठ्या संघांना धक्का बसला आहे. ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, श्रीलंका या संघाचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकन संघाने सोमवारी टी-20 विश्‍वकरंडकातील सलग तिसरा विजय मिळवला. श्रीलंका व नेदरलँड्स या संघांना पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश संघावर चार धावांनी मात केली. याचसह दक्षिण आफ्रिकेने सुपर-8 फेरीमधील प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे.

दक्षिण आफ्रिकन संघाकडून मिळालेल्या 114 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या बांगलादेशची सुरुवात निराशाजनक झाली. कागिसो रबाडा याने तानझिद हसन याला नऊ धावांवर बाद केले. त्यानंतर नजमुल शांतो (14), लिटन दास (9) व शाकीब हसन (3) या स्टार खेळाडूंना अपयश आले. त्यानंतर तौहीद हृदोय (37) व महमुद्दूलाह (20) यांनी विजयासाठी प्रयत्न केले; पण कागिसो रबाडा (2/19), अ‍ॅनरिक नॉर्खिया (2/17) व केशव महाराज (3/27) यांनी छान गोलंदाजी करीत बांगलादेशला सात बाद 109 धावांपर्यंत रोखले.

दरम्यान, याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनझिम साकीब याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. रीझा हेनड्रिक्स (0), क्विंटॉन डी कॉक (18), ट्रिस्टन स्टब्स (0) या तीन प्रमुख फलंदाजांना त्याने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तस्कीन अहमद याने कर्णधार एडन मार्करमला चार धावांवरच बाद केले. आफ्रिकेची पाचव्या षटकांत चार बाद 23 धावा अशी बिकट अवस्था झाली. हेनरिक क्लासेन व डेव्हिड मिलर या जोडीने 79 धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांचे आव्हान परतवून लावले. दक्षिण आफ्रिकेने शंभरी पार केल्यानंतर तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्लासेन 46 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर लगेचच रिशाद होसेन याने मिलरला 29 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत सहा बाद 113 धावा करता आल्या. बांगलादेशकडून तनझिम साकीब याने 18 धावा देत तीन फलंदाज बाद केले.

रबाडाच्या षटकाने फिरवले चित्र
वास्तविक, बांगलादेशला शेवटच्या 3 षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. पण 18व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करायला आला, ज्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर 37 धावांवर असलेला फलंदाज तौहीदला बाद केले. तसेच, या षटकात फक्त दोन धावा दिल्या. त्यामुळे बांगलादेशी फलंदाजांवर दबाव आला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात बांगलादेशचे फलंदाज झटपट बाद झाले.
Exit mobile version