दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

भारतीय संघावर आठ गडी राखून मात


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा आठ गडी राखून पराभव केला. हा सामना मंगळवारी (19 डिसेंबर) सेंट जॉर्ज पार्क, गाकबेर्हा येथे खेळवण्यात आला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघानं विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यातील विजयाने आफ्रिकेने मालिकेत 1-1 अशी बरोबरीत साधली आहे. आता तिसरा आणि निर्णायक सामना 21 डिसेंबरला पार्लमध्ये खेळवला जाईल.

प्रारंभी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामनं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. ब्यूरॅन हेंड्रिक्सने सॅमसनला, बर्गरने राहुलला आणि केशव महाराजने रिंकूला बाद केले. भारताचा डाव 211 धावांवर संपुष्टात आला. नांद्रे बर्गर याने 30 धावा देत तीन फलंदाज बाद केले.

हेंड्रीक्स व टोनी या सलामी जोडीने 130 धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर टोनी व ड्युसेन या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित केला. टोनीने कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 122 चेंडूंमध्ये नाबाद 119 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार 6 षटकार मारले. ड्युसेन याने 36 धावा करून त्याला उत्तम साथ दिली. आफ्रिकने दोन गडी गमावून अवघ्या 42.3 षटकांत सामना जिंकला.

भारतीय गोलंदाजांपैकी कोणीही आफ्रिकन फलंदाजांवर दबाव टाकू शकला नाही. केवळ अर्शदीप सिंह आणि रिंकू सिंहला प्रत्येकी एक बळी घेता आला.

Exit mobile version