दक्षिण आफ्रिकेची विश्वचषक इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या

श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव ,बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

2023चा एकदिवसीय विश्वचषक भारतात आयोजित करण्यात आला आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका हे संघ एकमेकांना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम या ठिकाणी भिडले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेला या निर्णयाचा पश्चाताप करुन दिला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत चांगलाच चोप दिला. या डावात दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतकं झळकावली आणि या शतकांच्या जोरावर विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावर लावली.

पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा 102 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. 429 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला श्रीलंकेचा संघ 44.5 षटकात 326 धावा करून सर्वबाद झाला.एडन मार्करामने अवघ्या 49 चेंडूत विश्वचषक क्रिकेट इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावलं, तर क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनीही शतकं झळकावल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने शनिवारी श्रीलंकेविरुद्ध 5 बाद 428 धावा केल्या, ही त्यांची स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच विश्वचषकामधील सर्वोच्च धावसंख्येचा एक नविन विक्रम देखील केला.दक्षिण आफ्रिकेसाठी, डी कॉक (84 चेंडूत 100), डुसेन (110 चेंडूत 108) आणि मार्कराम (54 चेंडूत 106) या तीन आघाडीच्या फलंदाजांनी शतके झळकावली. तसेच, 2015 मध्ये पर्थ येथे अफगाणिस्तानविरुद्ध सहा विकेट्सवर 417 धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यात दक्षिण आफ्रिकेने यश मिळविलं.डी कॉक आणि डुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 204 धावांची भर घालून मजबूत पाया रचला, तर मार्करामने 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने तुफानी खेळी खेळली. डी कॉकने आपल्या खेळीत 11 चौकार आणि तीन खणखणीत षटकार खेचले, तर डुसेनने डावात 13 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या तीन फलंदाजांचे विश्वचषकातील हे पहिलं शतक आहे.

या तिघांव्यतिरिक्त हेनरिक क्लासेनने 20 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 32 धावांचे योगदान दिले तर डेव्हिड मिलरने 21 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा श्रीलंकेचा निर्णय योग्य ठरला नाही. फलंदाजीसाठी खेळपट्टी अनुकूल होती आणि काही प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाजी आक्रमण कमकुवत झाले होते. दिलशान मधुशंकाने टेम्बा बवुमाला (08) पायचित करून श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली, पण त्यानंतर त्याचे गोलंदाज कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत.या स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलेल्या डी कॉकने आपल्या सदाबहार शैलीत फलंदाजी करत कारकिर्दीतील 18 वे शतक पूर्ण केले, तर डुसेनने त्याला चांगली साथ दिली आणि आपल्या 50 व्या एकदिवसीय सामन्यात त्याचे पाचवे शतक झळकावलं. डी कॉक बाद झाल्यामुळे ही भागीदारी तुटली, परंतु यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाजांना दिलासा मिळाला नाही कारण मार्करामने क्रीजवर येताच झटपट धावा केल्या आणि आयर्लंडचा विश्वचषकातील जलद शतकाचा विक्रम मोडला. केविन ओब्रायनने 2011 मध्ये 50 चेंडूत शतक झळकावले होते.

Exit mobile version