| पुणे | प्रतिनिधी |
राजकारणात सत्य बोलणे अडचणीचे असते, मात्र तरीही सकारात्मकता ठेवून सत्य बोलणे गरजेचे असते. लोकमान्यांच्या नावाचा पुरस्कार मिळावा इतका मोठा मी नाही. सगळी मोठी माणसे मोठी असतातच असे नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बऱ्याचदा जी माणसे दूर असतात तीच मोठी असतात. अनुभवाने ते आपल्या लक्षात येते, असे ते म्हणाले. लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक पुरस्कार ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी टिळक स्मारक मंदिरात गडकरी यांना देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ट्रस्टचे विश्वस्त माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, डॉ. प्रणती टिळक, डॉ. गीताली टिळक व्यासपीठावर उपस्थित होते. गडकरी म्हणाले, सत्ताकारण म्हणजे राष्ट्रकारण नाही. लोकमान्य टिळक व त्यांच्याप्रमाणे अनेकांनी जे केले ते राष्ट्रकारण होते. त्यांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याचा ऑक्सिजन आपण घेतो आहोत. त्यांना स्वराज्य पाहिजे होते व सुराज्यही. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार झाले पाहिजे. आपल्याकडे पैशांची, तंत्रज्ञानाची कमी नाही. इमानदारीने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची कमी आहे. लोकमान्यांच्या नावाने स्विकारलेल्या या पुरस्काराने आता जबाबदारी वाढली आहे. त्यांच्या स्वप्नातील सुराज्य तयार करण्यासाठीच यापुढे काम करणार आहे.






