| रायगड | प्रतिनिधी |
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) दि.30 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती सादर करता येणार आहेत. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती आणि नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दि.19 ते 27 सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत बीएलओ नागरिकांचे अर्ज स्वीकारणार आहेत.
एसआयआर प्रारूप मतदारयादीमध्ये अनेक मतदारांची नावे गैरहजर, स्थलांतरित किंवा अन्य कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. अशा मतदारांना त्यांच्या सध्याच्या रहिवासी ठिकाणाहून मतदारयादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी दावे व हरकतींच्या कालावधीत अर्ज करता येणार आहे. तसेच, 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नवमतदार, प्रारूप मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट न झालेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदीमध्ये सुधारणा किंवा नाव वगळण्यासाठी या विशेष शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, मतदार यादी अधिक सर्वसमावेशक करण्यासाठी महिला, दिव्यांग, तृतीयपंथी, अल्पसंख्याक तसेच इतर पात्र नागरिकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविण्यात यावा यासाठी विशेष जनजागृती आणि नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे देखील प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.







