भारताच्या ‘गब्बर’चा क्रिकेटला रामराम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाच्या गब्बरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली आहे. यामध्ये त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच, चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने आभार मानले आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने खेळाडूने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवनने डिसेंबर 2022 मध्ये एकदिवसीय मालिकेतील भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो सतत संघाबाहेर होता. परंतु, धवन आयपीएल 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. कारण त्याने व्हिडिओमध्ये आयपीएलमधून निवृत्तीबद्दल काहीही सांगितलेले नाही.
शिखरबरोबर गेली अनेक वर्षे एकत्र खेळलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनीही खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट शिखरबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून एकत्र खेळत आहे. ते दोघे दिल्लीकडूनही एकत्र खेळले आहेत. तसेच, रोहित शर्माही शिखरबरोबर बरीच वर्षे एकत्र खेळला आहे. या दोघांनी सलामीला खेळताना बऱ्याचदा अविस्मरणीय भागीदारीही केल्या आहेत.
शिखर धवनची कारकिर्द
शिखरने ऑक्टोंबर 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय मालिकेतून भारतासाठी पदार्पण केले होते. तो भारतासाठी 34 कसोटी सामने खेळला आहे. ज्यात 58 डावात त्याने 2 हजार 315 धावा केल्या आहेत. तर, 167 एकदिवसीय सामन्यात त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6 हजार 793 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटबाबात बोलायचे झाल्यास त्याने 68 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 1 हजार 759 धावा केल्या आहेत. यात 11 अर्धशतकांचा समावेश आहे.