शिष्यवृत्ती, क्रीडा साहित्यासाठी विशेष तरतूद

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड जंजिरा कार्यक्षेत्रामध्ये सर एस.ए. हायस्कूल व स्व. म.ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालय, अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, हिंदू बोर्डिंग हायस्कूल, अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज, वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय असून, यामध्ये दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा, व्यायाम इत्यादी गोष्टींबद्दल आवड निर्माण होऊन क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतेची तरतूद मुरुड जंजिरा नगरपरिषदतर्फे करण्यात आली आहे. ही मदत भविष्यातील जडणघडणीसाठी व मार्गक्रमणासाठी विद्यार्थ्यांना होईल, अशी माहिती मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.

क्रीडा क्षेत्रामध्ये त्या त्या वर्षी विशेष प्राविण्य मिळणविणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनीला रुपये पाच हजार त्या वर्षाकरिता प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार व दोन वरिष्ठ महाविद्यालयातील, क्रीडा क्षेत्रामध्ये त्या त्या वर्षी विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थी-विद्यार्थिनीला सात हजार पाचशे रुपये त्या वर्षाकरिता प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये शाळेचे -महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांच्याकडून शिफारस पत्र येणे आवश्यक आहे. त्याबरोबर तीन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालये व दोन वरिष्ठ महाविद्यालये यांना दहा हजार रुपये वार्षिक क्रीडा साहित्य खरेदी, देखभाल दुरुस्ती यासाठी विशेष अनुदान नगरपरिषदेमार्फत प्रदान करण्यात येणार आहे, अशी ही माहिती मुरुड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे यांनी दिली.

Exit mobile version