कोकणात जाण्यासाठी 250 गाड्या
| रायगड | प्रतिनिधी |
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने मुंबईतील कोकणवासियांनी कोकणात गावी जाण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 250 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोकणात 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. कोकणात जाण्यासाठी मुंबईतील कोकणवासियांची लगबग सुरू आहे. परंतु, एकाच वेळी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात असल्यामुळे प्रचंड गर्दी होते. त्यामुळे प्रवासादरम्यान असुविधा होते. ही गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर 250 विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी सावंतवाडी सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (40 फेऱ्या) गाडी क्रमांक 01151 विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री 12.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी दुपारी 2.20 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी 3.35 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4.35 वाजता पोहोचेल.
सीएसएमटी रत्नागिरी- सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (36 फेऱ्या) असणार आहेत. गाडी क्रमांक 01153 विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत दररोज सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01154 विशेष रेल्वेगाडी रत्नागिरी येथून 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत दररोज पहाटे 4 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता पोहोचेल. सीएसएमटी सावंतवाडी सीएसएमटी दैनिक विशेष रेल्वेगाडी (36 फेऱ्या) असणार आहेत. गाडी क्रमांक 01103 विशेष रेल्वेगाडी सीएसएमटी येथून 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01104 विशेष रेल्वेगाडी सावंतवाडी रोड येथून 23 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत दररोज पहाटे 4.35 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे त्याच दिवशी दुपारी 4.40 वाजता पोहोचणार आहे. हे आरक्षण 24 जुलैपासून सुरू होणार आहे.
गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण 24 जुलै रोजीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू करण्यात येणार आहे. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट आरक्षण अनारक्षित तिकीट प्रणालीद्वारे (यूटीएस) अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार करता येईल. मुंबई, पुण्यावरून जाणाऱ्या एकूण 138 विशेष रेल्वेगाड्याची सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये दिवा चिपळूण मेमूच्या 38 फेऱ्या धावतील. लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी रोड दैनिक विशेष रेल्वेगाडीच्या 72 फेऱ्या धावतील. लोकमान्य टिळक टर्मिनस सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या 6 फेऱ्या धावतील. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या 4 फेऱ्या धावतील. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव वातानुकूलित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या 6 फेऱ्या धावतील.






