भारतीय बॉक्सर्सची नेत्रदीपक कामगिरी

प्रतिस्पर्ध्यांना ठोसा; मिळवला ऑलिम्पिकचा कोटा

। बँकॉक । वृत्तसंस्था ।

अमित पंघाल व जास्मिन या भारतीय बॉक्सर्सनी रविवारी भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी करताना पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला. अमितने पुरुष विभागातील 51 किलो वजनी गटात, तर जास्मिनने महिला विभागातील 57 किलो वजनी गटात प्रतिस्पर्ध्यांना ठोसा लगावत भारताचा बॉक्सिंग या खेळातील अनुक्रमे पाचवा व सहावा कोटा मिळवून दिला. थायलंडमधील बँकॉक येथे जागतिक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

अमित पंघाल याने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या लिऊ चुआंग याच्यावर 5-0 असा सहज विजय मिळवला. जास्मिन हिला 57 किलो वजनी गटात खेळावे लागले. परवीन हूडाला निलंबित केल्यामुळे जास्मिनची या वजनी गटासाठी निवड झाली. जास्मिन ही 60 किलो वजनी गटात सहभागी होत असे, पण निवड समितीचा निर्णय तिने सार्थ ठरवला. जास्मिनने मरीन कमारा हिच्यावर 5-0 असा महत्त्वपूर्ण विजय संपादन केला. तीन खेळाडूंचे यशनिखत झरीन (50 किलो), प्रीती (54 किलो), लवलीना बोर्गोहेन (75 किलो) या तीन महिला बॉक्सर्सनी भारताला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला होता. आता या स्पर्धेमधून भारताला तीन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवून दिला आहे. अमित पंघाल व जास्मिन यांच्याआधी निशांत देव याने 71 किलो वजनी गटात कोटा मिळवून देण्याची कामगिरी केली आहे.

प्ले ऑफमध्ये निराशा
भारताला रविवारी आणखी एक ऑलिम्पिक कोटा मिळू शकला असता, पण थोडक्यासाठी हुलकावणी मिळाली. सचिन सिवाच याला 57 किलो वजनी गटात निराशेला सामोरे जावे लागले. किर्गीस्तानच्या मुनारबेक सेतबेक उल याच्याकडून त्याला तिसर्‍या स्थानासाठीच्या प्ले ऑफ लढतीत हार पत्करावी लागली. सचिनचा 5-0 असा पराभव झाला.
Exit mobile version