| नागोठणे | प्रतिनिधी |
गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये विलेपार्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील प्रतिभावान नेमबाज तनया निलेश जैन हिने आपल्या अचूक आणि दमदार नेमबाजीचे दर्शन घडवत 10 मीटर एअर रायफल प्रकारात तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली.
तनिया जैन ही नागोठण्यातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष जैन यांची नात असल्याने तिच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनयाने या स्पर्धेत सीनियर, ज्युनियर, युथ आणि सब-युथ अशा चारही गटांत अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने 400 पैकी तब्बल 397 गुण मिळवत नेमबाजीतील आपली गुणवत्ता आणि सातत्य अधोरेखित केले. चार गट, चार विजय आणि चार सुवर्णपदके, अशी दैदिप्यमान कामगिरी करत तनया जैनने आपल्या महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
तनयाच्या या उल्लेखनीय यशामागे तिचे प्रशिक्षक स्नेहल जितेश कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अचूक मार्गदर्शन, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि अविरत सराव तसेच अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे वेळोवेळी खेळाडूंना मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर तनयाची जिद्द यामुळे तिने हे यश संपादन केले. तनयाच्या या शानदार कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक, क्रीडा संकुलातील पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. नेमबाजीच्या क्षेत्रात तनया भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.







