शेकापकडून नव्या पिढीच्या वक्तृत्वाला मिळणार व्यासपीठ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त अलिबागमध्ये खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी विद्यार्थी संघटना, पुरोगामी युवक संघटना, सांस्कृतिक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा अलिबागमधील शेतकरी भवन येथे शनिवार दि.3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.00 वाजता सुरु होणार आहे. मीनाक्षी पाटील यांच्या अभ्यासू आणि प्रभावी वक्तृत्वाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या नाविन्य उपक्रमातून नव्या पिढीच्या वक्तृत्वाला व्यासपीठ मिळणार आहे.
शेकाप नेत्या स्व.मीनाक्षी पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शेतकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त आणि ग्रामीण भागातील विविध प्रश्न सातत्याने मांडले. विधिमंडळात अभ्यासपूर्ण भाषणे आणि आक्रमक भूमिका ही त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाचन, अभ्यास, विचार मांडण्याची क्षमता आणि प्रभावी वक्तृत्व विकसित व्हावे, या उद्देशाने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच समकालीन विषयांवर आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. सहभागी स्पर्धकांच्या वक्तृत्व कौशल्याबरोबरच विषयाची मांडणी, अभ्यास, भाषा आणि प्रभावी सादरीकरण याला महत्त्व दिले जाणार आहे.
स्व. मीनाक्षी पाटील यांच्या सार्वजनिक जीवनात वक्तृत्व, नेतृत्व आणि सामाजिक प्रश्नांवरील सातत्यपूर्ण भूमिका यांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित होणारी ही वक्तृत्व स्पर्धा त्यांच्या विचारांची आठवण जिवंत ठेवण्याबरोबरच नव्या पिढीला विचारांच्या व्यासपीठाशी जोडणारी ठरणार आहे. या स्पर्धेत 50 स्पर्धकांना संधी मिळणार आहे. आतापर्यंत 46 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. या स्पर्धेमध्ये आजचा विद्यार्थी आणि उद्याचा भारत, रायगडचा विकास आणि जनतेची अपेक्षा, सत्तेच्या सिंहासनावर नव्हे, जनतेच्या हृदयात घर करणारी ताई, मीनाक्षीताई, कलम जब जागती है तब सत्ता कांपती है, मजबुती का नाम महात्मा गांधी, जखमी लोकशाहीच्या कपाळावर आशेचे कुंकू लावतीय मी, अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विजेत्याला 15 हजार एक रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला 11 हजार एक रुपये व चषक, तृतीय क्रमांकाला सात हजार एक रुपये व चषक, चतुर्थ क्रमांकाला पाच हजार एक आणि चषक, पाचव्या क्रमांकाला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ म्हणून पाच बक्षीसे दिली जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार, एक व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
शेकापच्यावतीने आयोजित या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वेदांत कंटक आणि हर्ष ढवळे यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
