| अलिबाग | प्रतिनिधी |
मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील मांडवा जेट्टी येथे मरीन सोलुशन कंपनीची बेलार्डर नावाची बोट शनिवारी मुंबईतून प्रवासी घेवून मांडवा जेटी येथे आली. बोटीतून प्रवासी उतरल्यानंतर बोट समुद्रात पार्क करताना अचानक बोटीला आग लागली.
या आगीत बोटीतील कर्मचारी दिलदार मारणे व मोजिन कुरई (रा.वेशवी, बाणकोट, ता-मंडणगड, जि-रत्नागिरी) हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्यांना पुढील उपचारकरीता अलिबाग येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी जळालेल्या बोटीच्या ठिकाणी जावून इतर बोटीच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र बोटीमध्ये 200 लिटर पेट्रोलचा टँक असल्याने तसेच अन्य कोणताही अपघात होऊ नये, याकरीता बोट किनारी नेण्यात आली. तसेच अग्निशमन विभागाच्या मदतीने आग विझविण्यात आली.
याप्रकरणी बोटीचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर, मांडवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.