| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ गावाच्या पुढे ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विद्या मंदिर शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आणि टिपणीस महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी रस्त्यावर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांचा अनेकदा अपघात झाला आहे. दरम्यान, त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी पालक संघाने दोन महिन्यांपूर्वी केली होती. मागणी मान्य न झाल्यास हजारो पालक रस्त्यावर बसून रस्ता रोखणार होते. त्यामुळे कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवार असतानादेखील नेरळ विद्या मंदिर शाळेच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविले आहेत.
नेरळ विद्या मंदिर ही शाळा कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्याला अगदी लागून आहे. 3000 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पालकांनी शाळेकडे कर्जत कल्याण रस्त्यावर शाळेच्या बाहेर गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी अनेकदा केली.
दरम्यान, संस्थेच्या पालक शिक्षक संघाने संस्थेच्या पत्र व्यवहार यांचा आधार घेत कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे आवाज उठविला होता. नोव्हेंबरमध्ये त्या आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने बांधकाम विभागाने गतिरोधक बसविले नाहीत, परंतु रस्त्यावर झेब्रा क्रोससिंगचे पट्टे मारून दिले. मात्र, गतिरोधक बनविण्याची मागणी कायम होती. शेवटी पालक संघाने नेरळ विद्या मंदिर शाळेच्या संकुलाबाहेर रस्त्यावर बसून रस्ता रोखण्याचा निर्धार केल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग ठिकाणावर आले आहे. रविवार 15 जानेवारी रोजी सुट्टीचा वार असतानादेखील पालक संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गतिरोधक बसविण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष राजू झुगरे यांनी स्वतः तेथे उभे राहून काम करून घेतले.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत होतो. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून गतिरोधक टाकण्यासाठी सतत विलंब होत होता आणि त्यामुळे आम्ही रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र, या प्रकरणात माध्यमांनी घेतलेली भूमिकादेखील महत्त्वाची ठरली असून, गतिरोधक बनवले गेल्याने पालक समाधानी आहेत.
राजू झुगरे
पालक संघ उपाध्यक्ष