मुरुड पंचक्रोशीत भातकापणीला वेग

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुक्यातील 3300 हेक्टर भात पिकाखाली क्षेत्र असून, यावेळी शेतकर्‍यांनी 3000 हेक्टरात भातपिकासाठी सुवर्णा, रूपाली, शुभांगी, कर्जत, चिटू, साई, जया आदींसह पिकांची लागवड केली होती. यावर्षी वरूणराजाच्या कृपादुष्टीमुळे शेतामध्ये समाधानकारक शेतीयुक्त पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात पीक आले. यामुळे सर्व धरतीवर जणू सोनेरी शाल परिधान केलेली दिसून येत आहे. चार महिने अथक परिश्रम घेऊन बळीराजाला आता भाताचा दाणा पहावयास मिळाला आहे. यामुळे शेतकरी आनंदीत झाला होता.

शेतकरी वर्गाकडून भातकापणी व झोडणीच्या कामांना सुरूवात करण्यात आली. आता सर्वच ठिकाणी झोडणीची लगबग दिसून येत आहे. ऑक्टोबर हिट व त्यामुळे अंगातून बरसणार्‍या घामाच्या धारा यांची कोणतीही पर्वा न करता शेतकरी कामात गुंतला आहे. त्यातच शेतीच्या कामासाठी आवश्यक मजूरही मिळत नसल्याने थोडी तारांबळ उडत आहे. तरीही शेतकरी राजा झोडणीच्या कामात मग्न असल्याचे एकंदरीत चित्र दिसून येत आहे.

मुरुड तालुक्यात आतापर्यंत 65 टक्के भातकापणी झाली आहे. काही ठिकाणी खार जमीन असल्याने त्याठिकाणी भात कापणी झाली नाही. तिथे ही लवकरच भात कापणीला सुरुवात होईल, अशी माहिती कृषी अधिकारी यांनी दिली.

Exit mobile version