कापणीच्या कामाचा ताण, शिवारात भात पिक उभेच
| माणगाव | वार्ताहर |
बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. काही दिवसावरच मान्सूनच आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यतील शेतकऱ्याच्या उरात धडकी भरली. रब्बी हंगामातील शेतात अजून भाताचे पिक उभेच आहे. तो पर्यंतच मान्सूनचे आगमन होत असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे, तर रब्बी हंगामातील भात कापणीच्या कामाचा ताण शेतकऱ्यावर पडत आहे. यंदाच्या वर्षी रब्बी हंगामातील भात पिकाची ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी व लागवड केली त्या शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही अनेक ठिकाणी भातपिक उभे असून ते हिरवेगार आहे. पाऊस काही दिवसावर येऊन ठेपला असून शेतात उभे असणारे भात पिक कापायचे कसे, असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे. ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी व लागवड सुरुवातीच्या कालावधीत केली त्या शेतकऱ्यांच्या शेतात कापणी व मळणी चालू असून तीला वेग आला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत खरीप हंगामाच्या पिकासाठी उर्वरित शेतीची कामे कशी करायची, असा सवाल शेतकऱ्यापुढे उभा रहात असून अजूनही शिवारात भात पिक उभेच आहे त्यातच पाऊस माथ्यावर आल्याने शेतकऱ्याची पुरती घाई उडाली आहे.
डोलवहाळ बंधाऱ्यातून सुटणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यातील बहुतांशी शेती दुबार पिकासाठी अवलंबून असून यंदाचे वर्षी कालव्याचे पाणी उशिरा सुटले होते. त्या नंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली होती. रब्बी हंगामातील भाताचे पिक हे हमखास येणारे पिक म्हणून या पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळतो दर वर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी हि रब्बी हंगामात माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी 102 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली असून ज्या शेतकऱ्यांनी कालव्याला पाणी आल्याबरोबर भात पिकाची पेरणी केली होती त्यांचे पिक तयार होऊन त्यापिकाची कापणीची कामे जोरात सुरु आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी कालव्याला पाणी सुटल्यानंतर उशिरा पेरणी व लागवड केली, अशा शेतातील भातपीक अजून हि हिरवेगार असून ते कापायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असून धरलं तर चावतंय सोडल तर पळतंय असी अवस्था कांही शेतकऱ्याची झाली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. तर दुसऱ्या बाजूला शेतातील खरीप हंगामाच्या पेरणीची लगबगही सुरु केली असून बांध बंधीस्ती, नांगरणी, तसेच बी. बियाणे यांची खरेदी करणे आदी कामे सुरु असून यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. तालुक्यातील पाणसई, कालवण, दाखणे, इंदापूर, मुठवली, कशेणे, माणगाव, सह अनेक गावातील शेतकऱ्यांची रब्बी पिक कापणीची तर कुठे कापलेल्या पिकाची मळणीसाठी तर कुठे खरीप हंगामाच्या पेरणी व पेरणी पूर्व मशागतीसाठी पुरती घाई उडाली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच कामात गुंतला आहे.