जिल्ह्यात बांधबंदीस्तीच्या कामांना वेग

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पावसाळा सुरु होण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या निमित्ताने पावसाळा सुरु होण्यापुर्वीची मशागतीची कामे सुरु झाली आहेत. बांधबंदीस्तीसह अन्य कामांना वेग आला आहे. शेतकरी या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यात पावसावर अवलंबून असलेल्या भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. 95 टक्केहून अधिक शेतकरी पावसावर अवलंबून असलेली शेती करतात. जिल्ह्यामध्ये एक लाखाहून अधिक भात लागवडीचे क्षेत्र आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदा पाऊस लवकर पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाऊस कधीही पडू शकतो या भीतीने शेतकर्‍यांनी शेतावरील मशागतीची कामे सुरु केली आहेत. बांधावरील सुके गवत काढणे, राब तयार करणे, ते जाळणे, बांधबंदीस्ती करणे, अशा अनेक प्रकारच्या कामांना वेग लागला आहे. अलिबागसह अनेक तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे केली जात आहेत. या कामांना वेग आला असून ही कामे अंतिम टप्प्यात असल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे. शेतकामासाठी मजूर भेटत नसल्याने काही ठिकाणी कुटूंबियांसमेवत बांधबंदीस्तीची कामे केली जात आहेत. तर, काही ठिकाणी रोजंदारीवर कामे केली जात आहेत. मात्र, उन्हाचा तडाखा वाढल्याने बहुतांशी ठिकाणी सकाळी साडेसहा वाजल्यापासून ऊन डोक्यावर येईपर्यंत शेतावर बांधबंदीस्तीची कामे करीत आहेत. पुरुषांबरोबरच महिला वर्गदेखील या कामात मग्न असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळा जवळ आला आहे. त्यापुर्वी शेतातील बांधबंदीस्तीसह अन्य कामे सुरु केली आहेत. मजूरकर भेटत नसल्याने कूटूंबियासोबत ही कामे केली जात आहेत.

रामचंद्र शिंदे,
शेतकरी
Exit mobile version