। पनवेल । वार्ताहर ।
माजी नगरसेवक डॉ. अरुण कुमार भगत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कामोठे वसाहती मधील नादुरुस्त झालेल्या मलनिःसारण वाहिनीच्या दुरुस्ती कामाला सुरवात करण्यात आली आहे. वसाहती मधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणार्या केंद्राला जोडणारी मलनिःसारण वाहिनी नादुरुस्त झाली होती. यामुळे सांड पाण्याचा निचरा योग्यरीतीने होत नसल्याने वाहिनीतील घाण पाणी रस्त्यावर वाहून सर्वत्र दुर्गंधी पसरत होती. यामुळे अनेकदा शिवरेज लाईन साफ करणार्या यंत्राच्या माध्यमातून मलनिसारण वाहिन्या साफ करण्याचे काम करावे लागत होते. माजी नगरसेवक डॉ. भगत यांनी याबाबत पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून देत सांडपाणी प्रक्रिया केंद्राला जोडणारी मुख्य मलनिःसारण वाहिनी दुरुस्त करावी, अशी विनंती केली होती. भगत यांनी केलेल्या पत्राव्यव्हाराची दखल घेत पालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी मलनिःसारण वाहिन्या दुरुस्त करण्याच्या सूचना केल्याने दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.