| कारंजा | वृत्तसंस्था |
दुभाजक ओलांडताना भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. तालुक्यातील चंदेवाणी फाटा परिसरात शनिवारी (दि.28) दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रामदास उके (50) जि. अमरावती, असे मृताचे तर प्रल्हाद उके (36) रा. पिंपळोद असे जखमीचे नाव आहे.
चंदेवाणी परिसरातील मंगल कार्यालयात शुक्रवारी स्वागत समारंभाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासाठी आष्टी येथील सजावट साहित्य बोलावण्यात आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर आणलेले साहित्य परत करण्यासाठी आयशरने निघाले होते.
दरम्यान, महामार्गावरून दुभाजक ओलांडताना दुचाकी ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार रामदास उके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचा पुतण्या प्रल्हाद शिवदास उके हा गंभीर जखमी झाला. वळण घेताना आयशर चालकाने इकडे तिकडे न पाहता थेट वाहन टाकल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देत जखमीला कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने जखमींवर प्राथमिक उपचार करून नागपूर येथे हलविण्यात आले. या प्रकरणी कारंजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.