। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीच्या वादातून मामानेच आपल्या दोन भाच्यांवर चाकूचा जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
नागपूरच्या गांधीबाग गार्डनजवळ रविवारी (दि. 29) रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. बदन सिंह असे आरोपीचे नाव असून तो घटनेतील मृत रवी राठोड आणि दीपक राठोड या दोघांचा मामा आहे. तर रवी आणि दीपक हे दोघे भाऊ होते. आरोपी बदन सिंह याचा बांगडी विक्रीचा होलसेलचा व्यवसाय असून रवी आणि दीपक हे दोघेही आरोपीकडून बांगडी खरेदी करून शहरात विकायचे. कधी कधी दोघे मामाकडून उधारीवर बांगड्या खरेदी करून विक्री करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे उधारी राहिली होती. या उधारीच्या वादातूनच आरोपी बदन सिंह याने रवीवर चाकूने हल्ला केला. दीपकने भावाला वाचवण्यासाठी धाव घेतली असता मामाने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. तसेच घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.