| मुरुड | वार्ताहर |
मुरूड- अलिबाग रस्त्यावर बार्शिव गावच्या परिसरात रविवारी (दि.13) संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कारचालकावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागकडून मुरूडच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात अक्षय किसनलाल जयस्वाल (27) रा. रणदिवे आळी -मुरूड, लालचंद्र रामप्रसाद गौड (35) रा. भोगेश्वरपाखाडी- मुरुड या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातानंतर कार चालक तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मुरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. या अपघातातील आरोपी संदीप प्रभाकर म्हात्रे यास रेवदंडा पोलिसांनी रोहा तपासणी नाका येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे रस्त्यांवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.







