। पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोमवारी (दि. 8) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. भोगाव हद्दीत भरधाव कार पुढे जाणाऱ्या डंपरच्या मागील भागात घुसल्याने हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारी आयटेन कार भुयारी मार्गातून पुढे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार समोरील डंपरच्या मागील भागावर जोरात आदळली. या धडकेत कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातात निकेश बालन व लीसी बालन (63) दोघेही रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले. कशेडी पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तातडीने दोघांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलगा निकेश बालन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. गंभीर जखमी झालेल्या लीसी बालन यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, कळंबोली येथे हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, उपनिरीक्षक गिमनेकर, पोलीस हवालदार केदार व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच काळभैरव रेस्क्यू टीमचे अरुण मोहिते आणि लक्ष्मण कळंबे यांनीही बचावकार्यात सहभाग घेतला. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणाची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस हवालदार रंजेश पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.
Kashedi Ghat Accident: भरधाव कार डंपरखाली घुसली; एकाचा मृत्यू
