पोलादपूरनजीक भरधाव ‘लालपरी’ची बस- टेम्पोला जोरदार धडक 

महिला प्रवासी किरकोळ जखमी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई- गोवा महामार्गावर एसटी बस अपघातांची मालिका सुरु असून, शुक्रवारी (दि.24) सकाळी नऊ वाजता पोलादपूरनजीक तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली. पोलादपूर बस स्थानकातून बोरीवलीकडे जाणाऱ्या ‘लालपरी’ एसटी गाडीची महामार्गावरील हॉटेल राजमुद्रा जवळ चिपळूण- बदलापूर एसटी बस आणि टेम्पोला मागून धडक बसली. या धडकेमुळे बसमधील काही प्रवाशांच्या नाका तोंडाला किरकोळ मार लागला असून, या अपघाताची कोणतीही तक्रार दाखल नाही.

पोलादपूर बस स्थानकातूक पोलादपूर -बोरिवली ही बस महामार्गावरुन महाड दिशेला जात असताना हॉटेल राजमुद्रा जवळ आली. यावेळी त्या बसपुढे असणाऱ्या चिपळूण- बदलापूर बसला ब्रेक न लागल्याने वाहक बाजूला ठोकर बसली. चिपळूण -बदलापूर या बसने देखील पुढे असणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला मागून धडक दिल्याने तिहेरी अपघात झाला.

महामार्गावर अचानक मोकाट गुरे आल्याने त्यांना वाचविण्यासाठी माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने वाहनाचा वेग कमी केल्यानंतर त्या पाठोपाठ येणाऱ्या चिपळूण -बदलापूर बसनेसुद्धा वेग नियंत्रित केला. मात्र, त्या मागून येणाऱ्या पोलादपूर- बोरिवली वरील चालकाला वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने हा तिहेरी अपघातात घडल्याचे प्रवाशांनी सांगितले. या अपघातातील जखमी वसुधा वीर दीक्षित (50) यांच्यावर प्रथमोपचार करण्यात येऊन त्यांना पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. अपघातानंतर दोन्ही बसेस महामार्गाच्या बाजूला उभ्या असल्याचे दुपारपर्यंत पहावयास मिळाले. या अपघाताची तक्रार दाखल नसल्याने प्रवासी सुद्धा इतर वाहनाने मार्गस्थ झाले.

Exit mobile version