रसायनीकरांची मागणी
| रसायनी | वार्ताहर |
मोहोपाडा शहरात दर रविवारी आठवडा बाजार तुडुंब भरतो तो मैदानात भरविल जावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अरूंद रस्ता, वाहतूक कोंडी व भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर मांडलेले बस्तान अशा एक ना अनेक समस्यांमुळे मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरला असून बाजारपेठेतील गर्दीमुळे चालणे कठीण बनले आहे. यासाठी मोहोपाडा बाजारपेठेत बसविला जाणारा आठवडा बाजार हा मोहोपाडा प्रवेशद्वाराजवळील अचानक मैदानावर भरविण्यात यावा अशी मागणी रसायनीकर करीत आहेत.
मोहोपाडा आठवडा बाजारातील जागेचे नियोजन केल्यास दुकानदारांना सोयीचे होणार असल्याचे येथील व्यापार्यांचे म्हणणे आहे. या बाजारपेठेत ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग खरेदीसाठी येत असतो. या बाजारात कपडे व शोभेच्या वस्तू शहरातील अन्य दुकांनापेक्षा कमी किंमतीत मिळत असल्याने महिलांसह नागरिक आठवड्याचा माल खरेदी करत असतात. त्यामुळे या बाजाराला तालुक्यातून महत्त्व आले आहे. मोहोपाडा प्रवेशद्वाराच्या मुख्य रस्त्यावरच आठवडा बाजाराची जागा असल्याने या रस्त्यावरून वाहनांची रेलचेल सुरुच असते.
यावेळी भविष्यात एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरी मोहोपाडा येथील भरगच्च भरणा-या आठवडा बाजार मोहोपाडा गावाच्या प्रवेशद्वाराजवळील खुल्या मैदानावर भरविण्यात यावा अशी मागणी रसायनीकर करीत आहेत.