आज होणार ग्रामसभा
| मुरूड | वार्ताहर |
नांदगावच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाच्या माघी उत्सवानिमित्ताने भरविण्यात येणारी जत्रा यावर्षी रद्द करण्याच्या निर्णय मंदिराच्या चिटणीस -गुप्ते कौटुंबिक ट्रस्टने घेतला आहे.या विरोधात ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. सदरचा निर्णय रद्द करण्यात येवा याबाबत करावयाच्या विचार विनिमयासाठी नांदगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळी 11 वा.एका विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.
यंदा 25 जानेवारी रोजी माघी जत्रोत्सव आहे.मात्र गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे सदर जत्रेवर निर्बंध घातले गेले होते त्यामुळे ती भरली नव्हती. मात्र या वर्षी सदरचे निर्बंध शासनाने उठवले असतांना केवळ कोरोनाचा संभाव्य प्रकोप होण्याची भीती दर्शवून व समोरील छोट्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचे कारण दर्शवून ही जत्रा रद्द करण्यात आल्याचे न्यासातर्फे एक पत्र नांदगाव ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.
यामुळे नांदगावसह आजुबाजुच्या यशवंतनगर पंचक्रोशीतील भाविक तथा येथिल छोटेमोठे व्यावसायिक संतप्त झाले आहेत. सदर जत्रा कोणत्याही परिस्थितीत भरणारच या हट्टाला पेटले आहेत.त्यांनीच सदरच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे सुचवले आहे.त्यानुसार गुरुवारी 11 वा विशेष ग्रामसभा नांदगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.