। अलिबाग । प्रतिनिधी ।
अवकाळी पाऊस बुधवारी मध्यरात्री कोसळला. अलिबाग तालुक्यातील बेलोशी, महाजने, सागवाडी, मठवाडी, पाटवाडी येथील विज पुरवठा गुरुवारी सकाळी एक वाजता खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली. उकाड्यामुळे झोपेवरदेखील परिणाम झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे. कर्जत, खालापूर, पनवेल, उरण तालुक्यात सोमवारी (दि.13) सायंकाळी वादळी वार्यासह अवकाळी पाऊस कोसळला. त्यानंतर बुधवारी मध्यरात्रीपासून अलिबाग तालुक्यात पावसाने सुरुवात केली. वादळी पावसामुळे विज पुरवठा खंडित झाला होता. त्यात काही ठिकाणी विजेची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण रात्र अंधारातच काढण्याची वेळ नागरिकांवर आली. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. अखेर महावितरण कंपनीच्या कर्मचार्यांनी सकाळी युध्द पातळीवर विजेची समस्या सोडविण्याचे काम करीत वीज पुरवठा पुर्ववत सुरु केला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.