| अलिबाग । वार्ताहर ।
खोपोली येथील हाय डेफिनेशन स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित स्पिरिट शिल्ड पंधरा वर्षांखालील लेदर बॉल एकदिवसीय 45 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील साखळी सामन्यांत उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन व भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघांनी विजय मिळवला आहे.
उरण क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशनने नवीमुंबई वाशी येथील अविनाश साळवी फौंडेशन संघाचा 228 धावांनी पराभव करत सामना जिंकला. उरण संघाकडून ओम म्हात्रे यांनी 107 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 160 धावा ठोकल्या. त्याला समानावीर म्हणून गौरविण्यात आले, तर शौर्य पाटील यांनी 65 धावा केल्या. अविनाश साळवी फौंडेशन संघाकडून अर्णव रामदासी यांनी 63 धावांची खेळी केली.
दुसर्या एका साखळी सामन्यात भेंडखळ क्रिकेट अकॅडमी संघाने रोह्या येथील दिशा क्रिकेट अकॅडमी संघाचा 235 धावांनी पराभव करत सामना एकतर्फी जिंकला. भेंडखळ संघाचा गोलंदाज शिवांश तांडेल यांनी सर्वाधिक 5 गडी बाद केलं तर दक्ष पाटील यांनी 99, निर्जर पाटील 83, साम्य पाटील 73, जिग्नेश म्हात्रे नाबाद 54 धावा काढल्या. तर दिशा क्रिकेट अकॅडमी कडून अमित जोगडे यांनी 80 धावांची झुंज दिली. शिवांश तांडेल याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.स्पिरीट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला असून प्रत्येक संघाला 3 लिग मॅचेस खेण्यास मिळणार आहेत. प्रत्येक ग्रुप मधून 2 टॉप संघ उपपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.