देशभरातील साधू-संतांचा पेण नगरीत भरणार मेळा
। रायगड । प्रतिनिधी ।
देशभरात विविध नावाने ओळखल्या जाणार्या आगरी समाजातील साधू, संत, महंत, तपस्वी, स्वामी, कीर्तनकार, प्रवचनकार, वारकर्यांचा ऐतिहासिक, भव्यदिव्य मेळा पेण नगरीत पुढील महिन्यात भरणार आहे.
ज्या आगरी समाजाचा मोठा वर्ग आजही वारकरी, माळकरी, शाकाहारी आहे, साधू-संतांच्या सान्निध्यात राहिल्यानेच संत साहित्यात आगरी बोलीचा विशेष ठसा उमटलेला आहे. अशा प्रकारची ही उच्च आध्यात्मिक परंपरा अधोरेखित करण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेच्यावतीने आगरी समाजाची पहिली ‘राष्ट्रीय अध्यात्म परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. यांचे विशेष औत्सुक्य सर्वांनाच वाटून राहिले आहे. देशातील पंधराहून अधिक राज्यात वास्तव्य करुन असलेल्या 10 ते 12 कोटींच्या संख्येच्या आगरी समाज व त्याच्या पोटजाती, उपजाती आणि तत्सम मीठ उत्पादन करणार्या जातींतील सिध्द महापुरुषांच्या पदस्पर्शाने श्रींची माहेरघर असलेली पुण्यनगरी पावन होणार आहे.
प्रथमच संपूर्ण देशभरातील साधू-संतांचा, योगी-तपस्वींचा हा मेळा भरत असून, यावेळी निघणारी शोभायात्रा विशेष आकर्षणाचं केंद्रबिंदू असणार आहे. रथात विराजमान होऊन आशीर्वाद देणार्या साधू-तपस्वींचे दर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर उसळणार आहे. शेकडो भजनी मंडळ, महिला मंडळ, वारकरी मंडळ आणि भाविक भक्तांच्या सहभागाने ही परिषद अभूतपूर्व अशी होणार आहे.
ऐतिहासिक ठरणार्या या परिषदेची जोरदार तयारी सुरु असून, याकामी शेकडो कार्यकर्ते एकवटले आहेत. देशभरातील अध्यात्म क्षेत्रातील मंडळी आणि समाजबांधव मोठ्यासंख्येने या परिषदेत सहभागी होणार असल्याने ही परिषदेला व्यापक स्वरूप येणार आहे. एक दिवस समाजासाठी या टॅग लाईनखाली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी समाजाला आवाहन केल्याने यानिमित्ताने समाजबांधव मोठ्यासंख्येने एकवटणार असल्याची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.